नवी दिल्ली: गटार व सेप्टिक टँक साफ करताना १,०३५ सफाई कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. १९९३-२०२३ म्हणजेच ३० वर्षाची आकडेवारी केंद्राने सादर केली आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनी हाताने सफाई कामगारांच्या पुनर्वसनासाठी स्वयंरोजगार योजनेवर विचारलेल्या प्रश्नाला केंद्र सरकार उत्तर देत होते. गेल्या फेबु्रवारी महिन्यात २०१८ ते २०२२ या कालावधीत गटार आणि सेप्टिक टँक साफ करताना ३०८ लोकांचा मृत्यू झाला होता.
१९९३ पासून, देशभरात गटार आणि सेप्टिक टँक साफ करताना एकूण १ हजार ०३५ लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी ९४८ कुटुंबांना भरपाई देण्यात आली आहे. सामाजिक न्याय मंत्रालयाने १४ मार्च रोजी लोकसभेत ही माहिती दिली. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक ५२ मृत्यू, त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये ४६ आणि हरियाणामध्ये ४० मृत्यू झाले. महाराष्ट्रात ३८, दिल्लीत ३३, गुजरातमध्ये २३ आणि कर्नाटकात २३ जणांचा मृत्यू झाला.
अहवालानुसार, गेल्या ३ आर्थिक वर्षांपासून या योजनेसाठी अर्थसंकल्पीय वाटप कमी होत आहे. २०२३-२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने या योजनेंतर्गत कोणत्याही निधीची तरतूद केलेली नाही. २०२२ मध्ये, मंत्रालयाने स्वयंरोजगार योजना राष्ट्रीय कृती आराखड्यासाठी यांत्रिकीकृत स्वच्छता इकोसिस्टममध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला होता. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग ही यापुढे देशात प्रथा नाही असे सांगून या निर्णयाचे समर्थन केले.
सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात सुमारे ९७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सरकारने ५८ हजार ०९८ मॅन्युअल सफाई कामगारांची ओळख पटवली होती, या सर्वांना २०२० पर्यंत एकरकमी रोख रक्कम देण्यात आली होती. मिमी चक्रवर्ती यांना उत्तर देताना, २०२२-२३ पर्यंत एकूण ६०५ लाभार्थ्यांना गटार यंत्रणेच्या यांत्रिक साफसफाईसाठी भांडवली अनुदान दिले गेले. सरकारने २०२०-२१ ते २०२२-२३ या कालावधीत यासाठी भांडवली सबसिडीवर एकूण २ हजार १६५.७२ लाख रुपये खर्च केल्याचे सांगितले.
बंदी असतानाही हाताने साफसफाई
१९९३ मध्ये देशात प्रथमच हाताने सफाईच्या प्रथेवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर २०१३ मध्ये कायदा करून त्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. आजही समाजात हाताने सफाई करण्याची प्रथा आहे आणि गटार साफ करताना लोकांच्या मृत्यूच्या बातम्या येत असतात. कोणत्याही व्यक्तीला गटारात पाठविण्यास पूर्णपणे बंदी आहे. मात्र आपत्कालीन परिस्थितीत सफाई कामगाराला गटारात पाठवल्यास त्यासाठी २७ प्रकारचे नियम पाळावे लागतात. मात्र, या नियमांचे सातत्याने उल्लंघन होत असल्याने गटार सफाई करताना कामगारांना जीव गमवावा लागतो.